तो राजहंस एक …

 

गायन व अभिनय क्षेत्रातील कलाकारांच्या गेल्या तीन पिढ्या ज्यांना आपले दैवत मानत आल्या , त्या एकमेवाद्वितीय नटसम्राट बालगंधर्वांच्या समग्र सांगीतिक कारकीर्दीचा मागोवा घेणारा 'तो राजहंस एक ' हा दृक्श्राव्य कार्यक्रम श्री अतुल खांडेकर यांच्या संकल्पनेतून साकारला आहे . हा कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोव्यातील जाणकारांची व रसिकांची उदंड दाद मिळवत आहे. 

या कार्यक्रमामध्ये बालगंधर्वांच्या गाजलेल्या तसेच काही अप्रसिद्ध अशा पदांचे विस्तृत अथवा झलक स्वरुपात सादरीकरण अतुल हे स्वतः करतात . 
अतुल यांना भावलेले व उलगडलेले अभिनेते बालगंधर्व, गायक बालगंधर्व , शिष्य  बालगंधर्व , एक व्यक्ती म्हणून बालगंधर्व , बालगंधर्वांची अध्यात्मिक पार्श्वभूमी इत्यादी विविध विषयांना स्पर्श करीत जाणारा हा कार्यक्रम एका उत्तम निवेदकाच्या अथवा मुलाखतकाराच्या साथीने उलगडत जातो . 

अत्तराचा दरवळ आणि धूपाचा सुगंध अशा भारावून टाकणाऱ्या वातावरणात सादर होणारा हा कार्यक्रम ऑर्गन , तबला, व्हायोलीन , पखवाज या वाद्यांच्या साथीने  रंगत जातो .      

बालगंधर्वांच्या नंतर ज्यांनी बालगंधर्वांप्रमाणेच आपले  तन मन धन संगीत नाटकालाच वाहिले , त्या पद्मश्री जयमालाबाई शिलेदार व त्यांच्या कन्या कीर्ती शिलेदार यांचे बालगंधर्वांविषयीचे विचार व आठवणी या कार्यक्रमामध्ये मुलाखतीच्या रुपात पडद्यावर ऐकायला व पाहायला मिळतात . बालगंधर्वांना घडविणारे त्यांचे गुरु देवगंधर्व भास्करबुवा बखले यांच्या नातसून प्रसिद्ध गायिका शैला दातार यांचाही या कार्यक्रमामध्ये दृक्श्राव्य सहभाग आहे . रागदारी संगीताचा बादशहा समजले जाणारे पंडित कुमार गंधर्व यांना बालगंधर्वांच्या गायकी बद्दल काय वाटते हेही पडद्यावर पाहायला व ऐकायला मिळते . 

नटसम्राट बालगंधर्वांचे ध्वनिमुद्रण , ध्वनीचित्रमुद्रण तसेच सौ. शैला दातार यांनी उपलब्ध करून दिलेले बालगंधर्वांनी त्यांचे ज्येष्ठ गुरुबंधू व गुरु मास्तर कृष्णराव यांच्याविषयी केलेले भाषण, हे सर्व अनुभवण्याचे भाग्य रसिकांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभते . हा कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू असून तो रसिक मायबापांना आनंदाच्या शिखरावर घेऊन जातो .     

 


© www.atulkhandekar.com
Developed By : Maitraee Graphics