अतुल रवींद्र खांडेकर
आजच्या युवा पिढीचे अभ्यासू , प्रतिभावान आणि आश्वासक गायक समजले जाणारे श्री अतुल रवींद्र खांडेकर यांचा जन्म संगीताची समृद्ध परंपरा लाभलेल्या घरातच झाला .
अतुल यांच्या आजी , जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध गायिका स्व. श्रीमती माणिक भट यांनी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक , पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे प्रत्यक्ष शिष्य पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडून घराणेदार रागदारी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच स्व. बाळासाहेब माटे यांच्याकडूनही त्यांना दीर्घकाळ तालीम मिळाली . बालगंधर्वांचे ऑर्गन संगतकार स्व. श्री हरिभाऊ देशपांडे व त्यांचे सुपुत्र श्री चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडून त्यांना बालगंधर्व गायकीचे विशेष मार्गदर्शन लाभले होते .
ग्वाल्हेर घराण्याचा तसेच बालगंधर्व गायकीचा समृद्ध वारसा श्रीमती माणिक भट यांनी त्यांच्या कन्या , अतुल यांच्या मातोश्री , सौ . मानसी खांडेकर यांच्यामार्फत अतुल यांच्याकडे सोपवला .
पुण्यातील शास्त्रीय , नाट्य व सुगम संगीतातील सुप्रसिद्ध गायिका असलेल्या, आकाशवाणीच्या 'अ ' दर्जाच्या कलाकार असलेल्या , ज्यांनी पं, गंगाधरबुवा पिंपळखरे , डॉ . शोभा अभ्यंकर व डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्यासारख्या बुजुर्ग गुरूंकडे संगीताचा अभ्यास केला , त्या अतुल यांच्या मातोश्री सौ . मानसी खांडेकर यांच्याकडेच अतुल यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले .
सन १९९७ पासून आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका विदुषी डॉ . वीणा सहस्रबुद्धे या अतुल यांना गुरु म्हणून लाभल्या . ग्वाल्हेर घराण्याची समृद्ध परंपरा , त्याचबरोबर इतरही घराण्यातील सौंदर्यस्थळे आत्मसात करून वीणाताईंनी निर्माण केलेली स्वतंत्र गायनशैली , राग मांडणीतील ठेहेराव , लयकारी , मींड , तानक्रियेतील वैशिष्ठ्ये या व इतर अनेक गोष्टींचा अतिशय जवळून अभ्यास करण्याची संधी अतुल यांना वीणा सहस्रबुद्धे यांच्या प्रदीर्घ सहवासामुळे लाभली . आणि त्यातूनच अतुल यांची गायकी घडत गेली आणि परिपक्व होत गेली .
बालगंधर्वांची परंपरा प्राणपणाने जपणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका अभिनेत्री स्व. पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांचाही जवळून सहवास अतुल यांना लाभला , तो १९९४ पासून ते जयमालाबाईंच्या अखेरपर्यंत . आजीकडून आणि आईकडून बालगंधर्व गायकीचा वारसा मिळालाच होता , त्याच गायकीकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन जयमालाबाईंच्या मार्गदर्शनातून अतुल यांना मिळाला . जयमालाबाईंच्या कन्या ज्येष्ठ गायिका अभिनेत्री श्रीमती कीर्ती शिलेदार यांचेही बहुमोल मार्गदर्शन अतुल यांना नेहमीच मिळत असते . नाट्यसंगीताच्या क्षेत्रात अतुल यांना मिळत असलेले उत्तुंग यश हे केवळ शिलेदार कुटुंबियांच्या मार्गदर्शनामुळेच असे ते मानतात . मूलतः अभिनयामध्ये मुळीच न रमणारा हा कलाकार केवळ शिलेदार कुटुंबियांच्या प्रोत्साहनामुळे रंगभूमीवर उभा राहिला आणि त्याने संगीत सौभद्र व संगीत सुवर्णतुला या नाटकांमध्ये प्रमुख गायक नटाच्या भूमिका करून अनेक प्रयोग यशस्वी केले . यातूनच पुढे आकाशवाणी साठी संस्कृत मधून संगीत मानापमान व संगीत संशयकल्लोळ या नाटकांमधून भूमिका करण्याची संधी अतुल यांना मिळाली व त्यांनी रसिक मायबापांची वाहवा मिळवली .
विविध संगीत प्रकारांचा केलेला अभ्यास व साधना ही कलाकाराच्या प्रतिभेला व नवनिर्मितीला पोषक असते असे मत असलेल्या अतुल यांनी स्व. श्री गजाननराव वाटवे यांच्याकडे भावसंगीताचा , तसेच सौ . अश्विनी टिळक व श्रीमती शशिकला शिरगोपीकर यांच्याकडे ठुमरी - दादरा या उपशास्त्रीय गायनप्रकारांचा विशेष अभ्यास केला आहे .
स्व. पं . जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य श्री हेमंत पेंडसे यांच्याकडूनही अतुल यांना नेहमीच मार्गदर्शन मिळत असते .
अतुल हे आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून संपूर्ण भारतभर अनेक प्रतिष्ठित व्यासपीठांवर ते आपली कला सादर करून रसिकांची वाहवा मिळवत असतात .
त्यांच्या स्वतःच्या संकल्पनेतून साकारलेले 'संतरंगी रंगता' (मराठी व अमराठी संतांच्या बहुविध रचनांवर आधारित कार्यक्रम ) आणि 'तो राजहंस एक' (बालगंधर्वांच्या समग्र सांगीतिक कारकीर्दीचा मागोवा घेणारा दृक्श्राव्य कार्यक्रम ) हे कार्यक्रम जाणकारांच्या व रसिकांच्या विशेष पसंतीस पडलेले आहेत .
अतुल हे स्वतः सिव्हिल इंजिनियर असून सन २००६ साली विशेष गुणवत्ता श्रेणीमध्ये ही पदवी त्यांनी संपादन केलेली आहे . पितृगृहाकडून मिळालेला हा बांधकाम व्यवसायाचा वारसा सांभाळत असतानाही त्यांची संगीत क्षेत्रातील वाटचाल विशेष उल्लेखनीय आहे .
|