गुरूंचे आशीर्वाद
अतुलच्या संकेतस्थळासाठी एक गुरु म्हणून अतुलविषयी सांगताना मला अत्यंत आनंद होतोय. त्याची आई माझी विद्यार्थिनी. मी त्याच्या आईला शिकवत असताना ४ वर्षांचा अतुल माझ्याजवळ शांत बसून लक्षपूर्वक गाणं ऐकत असे. १९९७ पासून अतुल माझा प्रत्यक्ष शिष्य झाला. तो अतिशय तळमळीने माझ्याकडून गाणं शिकला. मी त्याच्यावर केलेले संस्कार आणि त्याला शिकवलेली गायकी याचे तो प्रामाणिकपणे अनुसरण करतो आहे हे पाहून आनंद होतो.
लहानपणापासून तो अत्यंत मेहनती मुलगा आहे. एक गायक कलावंत म्हणून अतुलची वाटचाल व प्रगती निश्चितच आनंददायी आहे. अतुलला त्याच्या सांगितिक वाटचालीसाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी माझे आशीर्वाद
---- डॉ. वीणा सहस्रबुद्धे
पुणे, दि . १२ जुलै २०१४ (गुरुपौर्णिमा)
मी अतुलला तो खूप लहान असल्यापासून पहातीये . त्याची आई मानसी माझी आई जयमाला शिलेदार यांच्याकडे नाट्यसंगीताचे शिक्षण घ्यायला येई . तिच्याबरोबर तोही येत असे . लहानपणापासून त्याचा संगीताकडे असलेला ओढा पाहून मला खूप कौतुक वाटायचं . स्वरेल , लयीचा पक्केपणा आणि नोटेशनवर असलेली त्याची हुकमत पाहून खूप आनंद व्हायचा . त्याची शास्त्रीय संगीताची बैठक उत्तम आहे. मेहनत घेण्याची प्रवृत्ती आहे .
पुढे तो वरचेवर आईकडे म्हणजेच जयमाला शिलेदार यांच्याकडे शिकायला वेळ काढून येऊ लागला . काही पदे मीही त्याला सांगितली आणि अर्थातच आमच्या काही मोजक्या संगीत नाटकातील काही भूमिका त्याने उत्तम रंगवल्या . पण त्याचा खरा पिंड गाण्याच्या बैठकीत जास्ती रमतो.
आता उदयोन्मुख अभ्यासू गायक म्हणून तो झपाट्यानी पुढे आला आहे. नटसम्राट बालगंधर्व यांच्यावरील कार्यक्रम तो अतिशय अभ्यासपूर्वक सादर करतो आहे . गुरुजानांवर श्रद्धा ठेवून , स्वतः मेहनत करून , उत्तम श्रवणभक्ती करून आपली गायकी त्याने विकसित केली आहे . श्री स्वामी समर्थ भक्त असल्यानी त्याच्यावर स्वामींची कृपाही आहे. संगीतक्षेत्रात तो 'अतुलनीय' व्हावा हीच माझी अंत:करणपूर्वक शुभेच्छा . . . !!!
- कीर्ती शिलेदार
पुणे, २९ ऑगस्ट २०१४ (गणेश चतुर्थी)
|